अतिवृष्टीने ४३ लाख शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र या शेतकऱ्यांना अजूनही अनुदान मिळालेले नाही. आतापर्यंत केवळ ५५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची मदत जमा झाली आहे. एकूण १ कोटी ९ लाख ८५ हजार बाधित शेतकऱ्यांपैकी ६६ लाख ५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे ४ हजार ९७१ कोटींचा निधी जमा करण्यात आला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे मराठवाड्यात ३२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने टप्प्याटप्प्याने जून ते सप्टेंबरपर्यंत झालेल्या नुकसान भरपाईसाठी मदतनिधी मंजूर केला. या निधीचे डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित बाधित शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून वाटप सुरू आहे. यात बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मयदित मदत दिली जात आहे. दरम्यान, जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टी, पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ८ हजार ९७६ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.

 सध्या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे. ११ नोव्हेंबरच्या अहवालानुसार आतापर्यंत ७६ लाख ३८ हजार ८८५ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. त्यातील ६६ लाख ५ हजार ८९२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४ हजार ९७१ कोटींची रक्कम जमाही झाली आहे. अनुदान वाटपाचे प्रमाण ५५.३९ टक्के असल्याचे सूत्रांनी नमूद केले. उर्वरित रक्कम खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. 

एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या १ कोटी ९ लाख ८५ हजार ५२ एवढी आहे. ई केवायसी किंवा फार्मर आय डी अर्थात अॅग्रीस्टॅक नोंद असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यात कोणतीही अडचण येत नाही, परंतु विभागातील हजारो शेतकऱ्यांचे ई केवायसी अद्याप झालेले नसल्याचे समोर आले. फार्मर आयडी अर्थात अॅग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.